Login

"काय माझा गुन्हा...?" भाग १२

सामाजिक

दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग १२



आता सकाळ झाली होती...

मुंबईत पावसाने थोडीशी उसंत घेतली होती... आभाळ अजूनही ढगाळ होतं, पण खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी खोलीत हलकीशी उब पसरवली होती...

जणू कालच्या अंधारानंतर आयुष्याने पुन्हा श्वास घ्यायला सुरुवात केली होती...

आरव आज नेहमीपेक्षा लवकर उठला... कारण कालची घटना त्याच्या मनातून काही केल्या जात नव्हती... स्वयंपाकघरात जाऊन त्याने साधाच, पण आपुलकीने भरलेला नाश्ता तयार केला...

गरमागरम पोहे आणि चहा... चहा आणि पोह्यांचा ट्रे हातात घेत तो हळूच गौरवीच्या खोलीकडे गेला... त्याने दारावर अलगद टकटक केली आणि म्हणाला,
“उठलीस का…? मी सकाळचा चहा-पोहा आणलाय...‌ म्हटल सोबत नाश्ता करु.... चालेल का तुला...?

आरवचे बोलणं ऐकून गौरवी बेडवर उठून बसली होती... रात्रभर रडून डोळे सुजले होते..., व चेहऱ्यावर थकवा आणि मनात अजूनही कालच्या जखमा होत्या...

आरव आत नाश्ता घेऊन आला... आणि त्याने तो ट्रे तिच्या समोर ठेवला आणि स्वतः थोड्या अंतरावर सोफ्यावर जाऊ बसला...

तिच्या अवकाशात न घुसता, तिच्या वेदनेचा आदर राखत तो बोलू लागला...
“आधी थोडं खाऊन घे… मग आपण बोलू...” तो शांत स्वरात म्हणाला...

गौरवी काही न बोलता हळूहळू उठली आणि बाथरूममध्ये जाऊन आधी फ्रेश होवून आली... आणि मग हळूहळू खायला सुरुवात केली...

प्रत्येक घासाबरोबर जणू तिचं मन थोडंसं स्थिर होत होतं... त्या शांततेत आरवने स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली जणू विश्वासाचा एक नाजूक पूल तो बांधत होता...

त्याने पोह्यांची प्लेट बाजूला ठेवत तिच्याकडे पाहून हलकंसं हसला...
“ मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे...  मुंबईत एका मोठ्या IT कंपनीत काम करतो... दिवसभर कोडिंग, मिटिंग्स, डेडलाइन्स सगळं धावपळीचं काम असतं... त्यात घरी यायला उशीर होतो तर कधी लवकर येतो... त्यामुळे घराचा पसारा झाला आहे... पण एक सांगू...? मला ना फिरायला खूप आवडतं...  वीकेंडला कुठेतरी बाहेर पडायचं, थोडा मोकळा श्वास घ्यायचा... मस्त एकट्यानेच इकडे तिकडे फिरत मस्त ऐंजोय करायचे...‌‌”

तो क्षणभर थांबला आणि पुढे म्हणू लागला...
“आई-वडील नागपूरला राहतात... बहीण पुण्यात वकिल आहे... तिचं लग्न झालंय, नवरा पुण्याचाच आहे ना...”

मग थोड्या संकोचाने, पण प्रामाणिकपणे तो म्हणाला..,
“माझं लग्न झालेलं नाही... इथे एकटाच राहतो... कधी कधी कोणी असतं आयुष्यात, कधी नसतं… सध्या तरी मी सिंगल आहे...”

तो तिच्याकडे पाहत थोडा गंभीर झाला होता...


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."